शहरातील मोंढा परिसरात २० हजार फूट जागेत १९६० साली बाजार समितीची इमारत बांधण्यात आली होती. कालांतराने मोंढा परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ्याचे बांधकाम करण्यात आल्याने या इमारतीचा मुख्य भाग झाकला गेला. या इमारतीत सभापती, उपसभापती, सभागृह, सचिव आणि वसुली, अस्थापना, लेखा विभाग असे कक्ष आहेत. इमारत जुनाट झाली असून कक्षातील छताचे प्लास्टर गळून पडत आहेत. शेतकऱ्यांची वर्दळ लक्षात घेता जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी जुनाट इमारत पाडून नवीन प्रशस्त इमारत उभारणीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. तसेच बांधकाम विभागाने इमारत पाडण्या योग्य असल्याचा अहवाल दिला होता. नवीन इमारत पाथरी रस्त्यावरील बाजार समीतीच्या जागेत आहे. मात्र निधी उभारणी होत नसल्याने नवीन इमारत उभारणीच्या हालचाली थंडावल्या आहेत. त्यामुळे जुनाट आणि धोकादायक बनलेल्या इमारतीत बाजार समितीचा कारभार केला जात आहे. सेलू बाजारपेठेत जिल्ह्यात सर्वाधिक कापासाची आवक होते. त्यामुळे बाजार समितीची इमारत अद्यावत आणि सोयी युक्त असावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून आहे.
नवीन इमारतीसाठी प्रयत्न करू
बाजार समितीची नवीन इमारत उभारणीसाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांसाठी नवीन रुग्णवाहिका, बंद असलेले चाळणी यंत्र, काटा सुरू करू तसेच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
विनायक पावडे, मुख्य प्रशासक बाजार समिती सेलू