परभणी : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ५ मे रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत बोंबलो आंदोलन केले.
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी निकाल देत हे आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयानंतर परभणीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी एकत्र आले. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांनी दिलेले बलीदान कदापि व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे यावेळी समन्वयकांनी सांगितले. यावेळी समन्वयक किशोर रनेर, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, आकाश कदम, शिवाजी मोहिते, गोपाळ कदम, अरुण पवार, गजानन लव्हाळे, अमोल हुडके, अमोल अवकाळे, स्वप्नील गरुड, रवि घयाळ आदींची उपस्थिती होती.