परभणी : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बैठक १३ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी टाकसाळे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहावे लागणार आहे. गावपातळीवर सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून त्या भागातील प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर गावनिहाय आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देशही टाकसाळे यांनी दिले. कोरोनाचा एखादा रुग्ण गावात दाखल झाल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात दाखल करणे आणि गावातील इतर ग्रामस्थांपर्यंत संसर्ग पोहोचणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.