परभणी : जिल्ह्यात भीम जयंती समित्या स्थापन झाल्या असून, हा सण पारंपरिक पद्धतीने आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा केला जाणार आहे. मात्र, कोरोनाची दहशत दाखवून शहरातील दुकाने परत बंद करण्यात आली आहेत. तेव्हा भीम जयंती उत्सवासंदर्भात प्रशासनाने लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हास्तरीय भीम जयंती मंडळ सुकाणू समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद केली आहेत. हा एक प्रकारे लॉकडाऊनच आहे. कडक निर्बंध लावा. पण लॉकडाऊन नको, असे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा ऐतिहासिक सण आहे. या सणाला कपड्यांपासून ते विविध वस्तूंची खरेदी केली जाते. परंतु दुकाने बंद केल्याने या सणावर लॉकडाऊनचे संकट आहे. शेजारील नांदेड जिल्ह्यात भीम जयंती साजरी करण्यासाठी अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवरुन विनाविलंब निर्णय होणे गरजेचे आहे. तेव्हा आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विजय वाकोडे, डी. एन. दाभाडे, रवी सोनकांबळे, मिलिंद सावंत, पू. भंते डॉ. उपगुप्त महाथेरो, प्रकाश कांबळे, आलमगीर खान, महावीरराजे भालेराव, सुशील कांबळे, अर्जुन पंडित, सुधीर साळवे, आनंद भदर्गे, यशवंत मकरंद, दीपक ठेंगे, चंद्रकांत लहाने, चंद्रकांत बहिरट, बन्सी निकाळजे, प्रदीप वाहुळे, ज्योती बगाटे आदींची उपस्थिती होती.