यावर्षी आंबा पिकास पोषक वातावरण असल्याचे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी परभणीच्या बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दीड महिन्यात फक्त ४ दिवस गेल्या आठवड्यात फळे व भाजीपाल्याची दुकाने सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. आता सोमवार ते बुधवार असे ३ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ग्राहकांमध्ये कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात भीती आहे. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडल्यास तयार नाहीत. परिणामी आंब्याची आवक वाढूनही ग्राहकी नसल्याने विक्रेते अस्वस्थ झाले आहेत. यंदा बाजारात केशर आंबा रिटेलमध्ये १५० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. रत्नागिरीचा हापूस आंबाही परभणीत आला असून, प्रतिकिलो २०० रुपयेप्रमाणे या आंब्याची रिटेलमध्ये विक्री केली जात आहे. गावराण अंबा मात्र बाजारात फारसा दिसत नाही. हा अंबा रिटेलमध्ये ६० रुपये किलो दराने विकला जात आहे.
आवक वाढली, ग्राहक रोडावले
गेल्यावर्षीपासून कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक ठरत असल्याने नागरिक फारसे घराबाहेर पडल्यास तयार नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत फळांचा समावेश असतानाही फळांच्या राजाची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोकण येथून आंबा आणून काही विक्रेते परभणीत तो विकतात. यावर्षीही त्यांनी आंब्यांची मोठ्या प्रमाणात बुकिंग केली, मात्र कोरोनामुळे ग्राहकांची मागणी नसल्याने तेही अडचणीत आले आहेत. परिणामी किरकोळ व ठोक दोन्ही विक्रेते सद्य:स्थितीत हैराण असल्याचे चित्र परभणीच्या बाजारात पहावयास मिळत आहे.
आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
लॉकडाऊनमुळे विदेशात आंबा विक्री करता येत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आंबा विकावा लागत आहे. त्यालाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सध्या २ टन आंबे पडून आहेत.
-ॲड. आनंद सूर्यवंशी,सोनपेठ
मागील तीन वर्षांपासून आंब्याचे उत्पादन घेतो. सर्व आंबा नैसर्गिक पध्दतीने गवतात पिकवूनच विकतो. यावर्षीे मात्र लॉकडाऊनमुळे बाजारात इतर आंब्यांचे दर पडले आहेत.
-भुजंग थोरे, देवनांद्रा, ता. पाथरी
कोकणमधून आणून आम्ही उत्कृष्ट दर्जाचा अंबा परभणीकरांना देतो. आत्तापर्यंत यासाठी चांगला प्रतिसाद मिळत होता. यावर्षी मात्र कोरोनामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे.
-अमोल देशमुख, विक्रेता
परभणीच्या बाजारात रत्नागिरीचा हापूस, कर्नाटकचा हापूस, केशर, दशहरी, गावराण आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून परभणी आंबा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत होता. यावर्षी मात्र कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे.
-श्याम बुरकुले, विक्रेता