जिंतूर : शालेय विद्यार्थ्याना स्पर्धेत उतरवून सामान्य ज्ञान वाढविण्याची संधी ‘लोकमत’च्या स्पोर्ट बूक या उपक्रमाने मिळवून दिली. ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल, असे प्रतिपादन ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते यांनी केले. येथील बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेत ‘लोकमत स्पोर्ट बूक’ व ‘कौन बनेगा चॅम्पियन’ या दोन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष राठी तर प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सविता वाघमारे, प्रतिष्ठीत व्यापारी सत्यनारायण शर्मा, मुख्याध्यापक विनोद पाचपिल्ले यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांच्या हस्ते लक्की ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता प्रथमेश आदमाने तर द्वितीय साक्षी आदमाने, तृतीय क्रमांकाचे बक्षिस सूरज कांबळे या विद्यार्थ्यास मिळाले. उर्वरित ७५ विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. राठी म्हणाले, ‘लोकमत’च्या उपक्रमाने विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली. हा स्तुत्य उपक्रम वर्षानुवर्षे ‘लोकमत’ राबवित आहे, अशाच उपक्रमातून ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासली तर डॉ. वाघमारे यांनी वॉटआॅप, फेसबूक व ट्युटरच्या जमान्यात विद्यार्थी वाचनापासून दुरावत असताना ‘लोकमत’ने विविध स्पर्धा आयोजित करून वाचन संस्कृती जोपासल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.डॉ. सुरेश सदावर्ते यांनी एक गझल सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने ज्ञानोपासक येथील विद्यार्थी मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश चांदजकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष चोपडे, मदन मोरे, प्रसाद घुगे, सुभाष धानोरकर, गणेश रुघे, ज्ञानदेव कुदळे, बळवंत कौसडीकर, अनिता मनोरवार, पद्मा जाधव, संध्या पाटोदे, शिवाजी काकडे आदींनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
‘लोकमत’ने दिले विद्यार्थ्यांना व्यासपीठ
By admin | Updated: August 10, 2014 00:10 IST