परभणी : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याजवळील साहित्य गायब झाल्याचे प्रकार जिल्ह्यातही घडले आहेत. यासंदर्भाने पोलीस ठाण्यात एकमेव तक्रार असली तरी अनेकांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार समोर आला नाही.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले. बाधित रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जवळ असलेले साहित्य गायब झाल्याचे प्रकार घडले आहेत. शहरातील आयटीआय, जिल्हा परिषद आणि सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार झाले. याठिकाणी देखील चोरटे सक्रिय असल्याचे दिसते. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातून मयत रुग्णाचा मोबाईल, तर आयटीआय येथील रुग्णालय परिसरातून रुग्णाच्या नातेवाईकाची दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे.
मयत रुग्णाचा मोबाईल चोरीला
कोरोनाने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जवळ असलेला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये एप्रिल महिन्यात दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात उपचार घेत असताना सेलू तालुक्यातील शिरसी बुद्रुक येथील एका तरुणाचा २३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी या तरुणाने २२ एप्रिल रोजी रात्री मोबाईल फोनवरून वडिलांशी संवादही साधला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्याजवळच्या साहित्याची माहिती घेतली असता मोबाईल गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात २७ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.