लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील गायरानधारकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली आहे. रिपाइंचे राज्य संघटक डी. एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १० फेब्रुवारी रोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांची भेट घेतली. गायरान जमिनी नियमानुकूल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. गायरानधारकांना सातबारा नोंदविण्यासाठी रिपाइंच्यावतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत न्याय मिळाला नव्हता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गायरान जमिनीसंदर्भात चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना तहसीलदारांना केली आहे. त्यामुळे गायरानधारकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला जाईल, असे तहसीलदार मांडवगडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस टी. आर. डाके, भगवान कांबळे, सतीश दामोधरे, भीमराव खाडे, रंगनाथ वाकळे, रामकिशन वाकळे, भिकाजी वाकळे, नाना चव्हाण यांच्यासह गायरानधारक उपस्थित होते.