शुक्रवारी गणेशपूर-वाघी रस्त्यावर घांगरा येथे जाणाऱ्या ग्रामस्थांना एका वाहनासमोर चक्क बिबट्या आला. ग्रामस्थांनी या बिबट्याचा व्हिडीओ तयार केला असून, शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर हा व्हिडीओ फिरत होता. वाघी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर, पोलीस पाटील व गावकऱ्यांनी याबाबत वनविभागाकडे पत्रव्यवहार करून, या बिबट्याला पकडून जंगलात हलविण्यासाठी विनंती केली होती. सध्या रब्बी हंगामातील पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात जागली करीत आहेत. अशातच शेतकरी व महिलांना बिबट्या व त्याचा बछडा नेहमीच दिसत असल्याने, गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यातच विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची वन विभागाने सुटका केली होती. हा बछडा त्याच्या आईपासून वेगळा झाल्याने, मादी बिबट्या बछड्याच्या शोधत फिरत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत, वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी वडी, वाघी हनवत खेडा परिसरात दोन दिवस पेट्रोलिंग केले, परंतु बिबट्या हाती आला नाही. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी गणेशपूर-वाघी रस्त्यावर वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाकडून पाहणी : गणेश घुगे
वाघी गणेशपूर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर, शनिवारी वनपाल गणेश घुगे व वनरक्षक कुंभकर्ण यांनी या रस्त्यावर जाऊन पाहणी केली. वाघी धानोरा परिसरात मादी बिबट्या व त्याचा बछडा असून, त्याचा शोध लवकरच घेतला जाईल, असे वनपाल गणेश घुगे यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले.