डीपींचा पादचाऱ्यांना वाढला धोका
परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेने वीज वितरण कंपनीच्या डीपी उभारण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश डीपीला कुलूप लावलेले नाही. तसेच काही डीपी सराड उघड्या असतात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे एखादा अपघात झाला तर गंभीर घटना घडना घडू शकते. तेव्हा महावितरण कंपनीने या डीपींना दरवाजे बसवून कुलूपबंद करावे, अशी मागणी होत आहे.
मनपाच्या उद्यानांची बकाल अवस्था
परभणी : शहरातील मनपाच्या उद्यानांची अवस्था बकाल झाली आहे. मागील वर्षभरापासून या उद्यानांमध्ये कोणतीही विकास कामे झाली नाहीत. लॉकडाऊनमुळे बंद असलेली उद्याने आता खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील मुख्य उद्यान असलेल्या राजगोपालाचारी उद्यानातच खेळणींची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे नेहरू पार्क, गांधी पार्क आणि शिवाजी पार्क या चारही उद्यानांची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांची मात्र कुचंबणा होत आहे.
जिंतूर रस्त्याच्या कामाला गती
परभणी : जिंतूर ते परभणी या महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली असून, सध्या परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहरापर्यंत एका बाजूने रस्त्याची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करुन जिंतूर- परभणी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
ग्रामीण बससेवेला लागेना मुहूर्त
परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एस.टी. महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत प्रमुख मार्गावरील बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना जिल्ह्याचे अथवा शहराचे ठिकाण गाठण्यासाठी खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. खाजगी वाहतुकीने प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
जायकवाडी कालव्याचे पाणी दाखल
परभणी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. रबी हंगामातील तिसरे पाणी आवर्तन शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.