परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मलिक यांनी गुरुवारी शहरातील सर्व कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मलिक म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने ७०० खाटांची क्षमता सध्या उपलब्ध केली असून, आणखी ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर कल्याण मंडपम या ठिकाणी उभे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ५० खाटांचे सेंटर प्रत्येक तालुक्यात उभारून ४०० बेड आणखी वाढविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये किमान १ हजार बेडची क्षमता वाढलेली जाईल. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल. सध्या जिल्ह्याला कर्नाटकातील बेल्लारी येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून दररोज २० के एल ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शन संदर्भातही तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्याला मोठा साठा उपलब्ध होईल. कोविड रुग्णालयाच्या बाहेर मोठे स्क्रीन लावून रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेट या संदर्भातील माहिती द्यावी, असे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खा. फौजिया खान, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.
रुग्णांचा मनोरंजनाची ही सुविधा
कोरोना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे साहित्यही उपलब्ध करून केले जाईल. त्यानुसार रुग्णालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी टीव्ही तसेच ग्रंथालय उपलब्ध केले जाणार आहेत.
जिल्ह्यात मृत्यूचा दर का वाढला
नागरिक कोरोनाचा आजार अंगावर काढतात. गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ही अधिक असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.