परभणी : येथील संतसेनानगरातील उपासकांनी स्वबळावर आणि स्वाभिमानाने त्रिरत्न बुद्धविहाराची उभारणी केली आहे. ही बाब आदर्श असून, इतरांसाठी अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हत्तीअंबिरे बोलत होते. याप्रसंगी साऊथ कोरिया येथील आईदा संस्थेने वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल संत सेनानगर, त्रिरत्न बुद्धविहार समिती व आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा सत्कार करण्यात आला. संत सेनानगरवासीयांप्रमाणेच प्रत्येक नगरात बुद्ध विहार झाले पाहिजे. तेही स्वाभिमानाने, स्वबळावर. यासाठी या वसाहतीतील नागरिकांचा आदर्श घेणे काळाची गरज आहे, असे सांगून विहाराच्या सुशाेभीकरणासाठी हत्तीअंबिरे यांनी २५ हजार रुपयांची रक्कम प्रदान केली. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.