नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा रखडला प्रस्ताव
परभणी : येथील नटराज रंग मंदिराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव रखडला आहे. मध्यंतरी मनपा प्रशासनाने नाट्यगृह दुरुस्तीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी, मागील सहा वर्षांपासून नाट्यगृह बंद आहे.
वाळूअभावी घरकुलांची बांधकामे रखडली
परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने, खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध नाही. परिणामी, चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानात घरकूल बांधकाम करणे शक्य नसल्याने, लाभार्थ्यांनी घरकुलांची बांधकामे बंद ठेवली आहेत. प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
स्टेडियम परिसरात स्वच्छगृहाचा अभाव
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह नसल्याने व्यापारी व नागरिकांची कुचंबना होत आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मनपाने या भागासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तेव्हा जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.
गहू, हरभऱ्याचे पीक बहरात
परभणी : जिल्ह्यात या वर्षी गहू आणि हरभऱ्याचे पीक बहरात आहे. जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन मिळाल्याने, या पिकाला वेळेवर पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे दोन्ही पिकांची वाढ सध्या समाधानकारक आहे. यंदाच्या रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रब्बीचे उत्पादन वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
उद्यानांची दुरुस्ती करण्याची मागणी
परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानासह इतर दोन उद्यानांची दुरवस्था झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून, मनपाने विकास कामे हाती घ्यावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. राजगोपालाचारी उद्यानासह नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरात वाढली अस्थायी अतिक्रमणे
परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ही अतिक्रमणे असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटवावीत आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.