शहरातील शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वाहनतळ परिसरात १०० हून अधिक दूचाकी वाहने उभी होती. तसेच काही चारचाकी वाहने आणि मुख्य प्रवेशद्रारासमोर वाहनांसह नागरिकांची रेलचेल दिसून आली. विशेष म्हणजे, कार्यालयात कर्मचारी संख्या कमी आणि किरकोळ तसेच आवश्यक कामानिमित्त बाहेरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची मात्र गर्दी झाली होती. अशीच परिस्थिती शहरातील अन्य कार्यालये आणि बँकांमध्ये पहावयास मिळाली. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन व मास्क न घालताच नागरिक ये-जा करत असल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या परिसरात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची रेलचेल वाढली आहे. सोमवारी दुपारी १ ते २ च्या दरम्यान या ठिकाणी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच एलआयसी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हाकचेरी, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोविड सेंटर, शासकीय रुग्णालय आणि विविध बँक परिसरात ही गर्दी झाली होती.
सर्व कार्यालयात तपासणीची गरज
शहरातील सर्व शासकीय कार्यालय जिथे नागरिकांशी निगडीत कामे आहेत, अशा ठिकाणी कोणालाही कामासाठी आल्यावर प्रवेश देताना मास्क वापरले आहे का नाही. तसेच कार्यालयातील विविध विभागात सामाजिक अंतराचे पालन होत आहे की नाही, याची पाहणीव तपासणी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी करावी.