परभणी : पूर्णा तालुक्यातील कळगाव येथे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत आढळले असून, गळफास घेऊन पतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पत्नीच्या मृत्यूचे कारण पोलीस शोधत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.
मोतीराम रामराव देवकते व श्यामबाला मोतीराम देवकते अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. मोतीराम व श्यामबाला यांचा विवाह मे महिन्यात झाला होता. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दोघेही खोलीतून बाहेर आले नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांनी दार वाजविले. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर दरवाजा तोडून आत पाहिले असता मोतीराम देवकते हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर त्यांची पत्नी श्यामबाला ही बेशुद्धावस्थेत होती. कुटुंबीयांनी तातडीने श्यामबाला हीस खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, परभणी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार राठोड, कर्मचारी धनंजय कणके, गणेश लोंढे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.