कोरोना संसर्गाचा ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असल्याच्या कारणावरून या वयोगटापुढील व्यक्तींना अधिक काळजी घेण्याचे प्रशासनाने सूचित केले होते. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांची काळजी घेतली; परंतु या प्रशासकीय पातळीवरील काही निर्णयाने अनेकांनावर बेरोजगारी ओढावली आहे. पोलीस विभागानेही राज्य स्तरावरून ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डस्ची सेवा घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जिल्ह्यातील १७५ होमगार्डस्वर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शासनाने या दुर्लक्षित घटकाला मदत देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
७० टक्के लसीकरण
जिल्ह्यात सध्या सेवा देणाऱ्या ८७० होमगार्डस्पैकी जवळपास ७० टक्के होमगार्डस्चे लसीकरण करण्यात आलेले आहे. तरीही जवळपास ३० टक्के होमगार्डस्चे अद्याप लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे.
आम्ही जगायचे कसे?
शासनाला गरज लागली तेव्हा आम्ही सेवा दिली. आता ड्यूटीची गरज असताना कोरोनाच्या कारणावरून ड्यूटी देणे बंद करण्यात आले आहे. शासनाचे हे धोरण चुकीचे आहे. यावर विचार करावा.
- सुनील काळे, होमगार्डस्
कोरोनामुळे ५० वर्षांपेक्षा अधिक वय असल्याने शासनाने आमची सेवा घेणे बंद केले आहे. त्यामुळे बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. शासनानेच आता आम्हाला मदत करावी.
- संजय बोडखे, होमगार्डस्
गेले अनेक वर्षे आम्ही सेवा दिली. आता वय ५० वर्षांपेक्षा जास्त असल्यावरून आम्हाला काम दिले जात नाही. हे चुकीचे आहे. काम दिले जात नसेल तर बेरोजगार भत्ता व रेशनचे दरमहा मोफत धान्य द्यावे.
- पुरुषोत्तम बनसोडे, होमगार्डस्
होमगार्डस् ना एक तर खूप कमी मानधन मिळते. गरज म्हणून आम्ही तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे सेवा दिली. आता केवळ वय अधिक आहे, म्हणून ड्यूटी दिली जात नसेल तर ते अन्यायकारक होईल. त्यामुळे शासनाने आम्ही आतापर्यंत दिलेल्या सेवेचा विचार करून मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे. यासाठी स्वतंत्र आदेश काढावा.
- शंकर, जाधव, होमगार्डस्