परभणी : उघड्यावरील हागणदारी म्हणजे मानवाला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.
सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे १३ फेब्रुवारी रोजी ‘माझे गाव सुंदर गाव’उपक्रमांतर्गत आयोजित संवाद कार्यक्रमात टाकसाळे बोलत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एस. अहिरे, सरपंच सपना सावंत, उपसरपंच लहानाप्पा हारकळ, माजी सरपंच प्रकाश मुळे, दिगंबर गिराम, ग्राम विकास अधिकारी जयराम नटवे, सीडीपीओ कच्छवे, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
टाकसाळे म्हणाले, युवकांनी पुढाकार घेतल्यास गावे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षक, ग्रामसेवक आणि अंगणवाडीताई यांनी शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गावातील नाल्या तुंबत आहेत. दूषित पाण्यामुळे आणि डासांमुळे डेंग्यू, कॉलरा, हत्तीरोग, टॉयफाईड सारखे आजार बळावतात. तेव्हा प्लास्टिक आणि अस्वच्छतेला हद्दपार केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही, मोटायसायकल यापेक्षा स्त्रियांच्या सन्मानासाठी शौचालय महत्त्वाचे आहे. ते बांधून प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर सुरू करावा, असे आवाहन टाकसाळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.