खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी शेतकरी विक्रीसाठी परभणी येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणतात. मालाची विक्री केल्यानंतर शेती उपयोगी साहित्य व बी-बियाणांची खरेदी करतात. मात्र, यावर्षी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २२ मार्चपासून संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे संचारबंदीचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. एरव्ही ३० हजार क्विंटल धान्यांची खरेदी होती; मात्र एप्रिल महिन्यात केवळ ६ हजार ४२३ क्विंटल धान्य विक्रीस आले.
शेतकरी म्हणतात...
रब्बी हंगामात झालेला हरभरा, ज्वारी व गहू हा शेतमाल विक्री करून खरीप हंगामातील बियाणे व खताची जुळवाजुळव करायची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सततच्या संचारबंदीमुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतमालाला भाव मिळत नाही.
-नरसिंग ढेंबरे, शेतकरी
भाववाढीच्या आशेने खरीप हंगामातील जवळपास ३० क्विंटल सोयाबीन घरात पडून आहे. सध्या ६ हजार ते ६६०० रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र, संचारबंदीमुळे हा शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणण्यासाठी अडचणी येत आहेत.
-पांडुरंग बनसोडे, शेतकरी
सोयाबीनला उच्चांकी भाव
मागील १०-१५ वर्षांच्या काळात यावर्षी सोयाबीनला उच्चांकी ६ हजार ते ६६०० रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे भाववाढीच्या आशेने सोयाबीन घरात ठेवलेल्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत, तर दुसरीकडे हरभऱ्याला केंद्र शासनाच्या वतीने ५ हजार १०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी परभणी येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तसेच रब्बी हंगामातील गहू व ज्वारी शेतमालालाही समाधानकारक दर मिळत असल्याने यावर्षी शेतकरी शेतमालाच्या भावाबद्दल समाधानी असल्याचे मंगळवारी बाजार समितीच्या मार्केट यार्डात उपस्थित शेतकऱ्यांच्या चर्चेतून उलगडले.