परभणी : श्रीरामांच्या जन्मभूमीवर मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केले जाणार असून, त्यासाठी रामभक्तांचे अधिकाधिक योगदान लाभावे, या उद्देशाने १५ जानेवारीपासून जिल्ह्यात निधी संकलन अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर व विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या श्रीराम रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील नियोजित जागेत भूमिपूजन सर्व ट्रस्टी व धर्माचार्य यांच्या इच्छेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिराची उभारणी करताना देशातील प्रत्येक नागरिकाचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात, या हेतूने मकर संक्रांतीपासून महिनाभर घरोघरी रामभक्त कार्यकर्ते निधी जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधी कुटुंबीयांना समर्पित करता यावा, यासाठी १०, १०० व १००० रुपयांचे कुपन्स तयार केले आहेत. त्यावर नियोजित श्रीराम मंदिराचे चित्र राहणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील १५ हजार कार्यकर्ते ३ लाख घरांशी संपर्क साधणार आहेत. हे अभियान देवगिरी प्रांतांतर्गत चालणार आहे. त्यात सर्व जिल्हावासीयांना संपर्क करून त्यांचा खारीचा वाटा श्रीराम मंदिर निर्माणात घेतला जाणार आहे. त्यामुळे केवळ निधीच नव्हे तर रामभक्तांनी त्यांचा वेळही द्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. या पत्रकार परिषदेत महंत अखिलेश्वर दास, ॲड. दादासाहेब पवार, ह.भ.प. माधवराव आजेगावकर, डॉ. रामेश्वर नाईक, विहिंपचे जिल्हा महामंत्री सुनील रामपूरकर, ॲड. राजकुमार भामरे, गणेश काळबांडे, सुरेश ठोंबरे, संतोष देवडे आदी उपस्थित होते.