परभणी : कोरोना संकटाच्या झळा सहन करणाऱ्या येथील नागरिकांना आता महागाईचा भडकाही सहन करावा लागत आहे. मागच्या चार महिन्यांत पेट्रोलचे दर ६ रुपये २ पैशांनी, डिझेल २ रुपये २९ पैशांनी, तर स्वयंपकाचा गॅस थेट १०० रुपयांनी महागला आहे. इंधनाच्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, वाढत्या महागाईने जिल्हावासीय मेटाकुटीला आले आहेत.
मागील वर्षभर कोरोनाच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागले. अनेकांचे रोजगार हिरावले गेले, तर बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: पछाडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. त्यातच केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवर कर लावण्याचा निर्णय घेतल्याने या किमती आणखीच वाढत आहेत. नोव्हेंबर महिन्यात ८९.९५ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होणारे पेट्रोल फेब्रुवारी महिन्यात ९५.९६ रुपयांवर पोहोचले आहे, तर १ नोव्हेंबर रोजी ८२.८५ रुपये प्रतिलिटर असलेले डिझेल ८५.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. दुसरीकडे स्वयंपकाच्या गॅस दराचाही भडका होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या गॅस सिलिंडरच्या दराच्या तुलनेत तब्बल १०० रुपयांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरावरच बाजारपेठेतील इतर वस्तू, खाद्यपदार्थांचे दर अवलंबून आहेत. कोणत्याही वस्तू, पदार्थाची किंमत वाहतूक खर्च एकत्रित करून लावली जाते. त्यामुळे इंधनाचे दर वाढताच बाजारपेठेतही महागाई नांदते. सध्या त्याचाच फटका परभणीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थिक झळा सहन करणाऱ्या नागरिकांना आता इंधन दरवाढीमुळे झालेल्या महागाईत अक्षरश: होरपळून टाकले आहे. त्यामुळे दैनंदिन बजेटच कोलमडून गेले असून, महागाई वाढत चालल्याने सामान्य नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.