परभणी येथील दर्गा रोड रोड भागातील कुर्बान अली शाह नगर येथील रहिवासी असलेले मिर्झा हाशम बेग (७०) हे गेल्या वर्षापासून औरंगाबाद येथे राहत होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे १९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. १९७४ साली औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली होती. त्यानंतर औरंगाबाद येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. १९८२ मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली. शिस्तप्रिय, कायद्यावर प्रचंड प्रभुत्व असलेला न्यायाधीश म्हणून त्यांची न्यायपालिकेत ख्याती होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने त्यांना निवृत्तीनंतरदेखील तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त केले होते. तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून परभणी येथे कार्यरत असताना रात्री उशिरापर्यंत न्यायालयाचे कामकाज त्यांनी चालवले. न्यायक्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या वकिलांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
माजी न्यायाधीश मिर्झा हाशम बेग यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST