कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दररोज आढळणाऱ्या बाधित रुग्णांमुळे धोका कायम असल्याने शासनाने लावलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. शनिवारी, रविवारी वीकेंड लाॅकडाऊनला जीवनावश्यक वस्तू, किराणा, भाजीपाला, बेकरी, मिठाईची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, सर्वच व्यापारी वीकेंड न पाळता आपली दुकाने सुरूच ठेवत असल्याचे शनिवारी दिसून आले. यातच सुमारे दीड वर्षांपासून बंद असलेला जनावरांचा आठवडी बाजार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरल्याने व्यापारपेठेत गर्दीच गर्दी झाली होती. शनिवार बाजारासमोरील नांदेड-पुणे महामार्गावरसुद्धा बकरी, शेळी विक्रीसाठी आलेल्या पशुपालकांनी ठाण मांडल्याने या रस्त्यावरची वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती. जनावरांच्या आठवडी बाजारासह व्यापार पेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत कोरोना हरवल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पोलिसांनी अनावश्यक दुकाने बंद केली
शनिवार हा वीकेंडचा दिवस असल्याने व्यापारपेठेत गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, त्र्यंबकराव शिंदे, उमाकांत जामकर, संतोष शिंदे आदींनी गस्त घालून वीकेंडला सूट नसलेली कापड, बूट, चप्पल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, जनरल स्टोअर्स आदी अनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले, तसेच काही दुकाने बंद केली. यामुळे रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात ओसरली होती.
लाखोंची उलाढाल
गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना विक्रीसाठी आणले होते. या बाजारात दिवसभरात पशूंच्या खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली.