सेलू : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोमवारी नदीपात्रात सोडणार असल्याची माहिती आ. विजय भांबळे यांनी रविवारी भ्रमणध्वनीवरुन दिली. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्याशी याबाबत दोन वेळा चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधना काठावरील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामासाठी उजव्या व डाव्या कालाव्यात पाणी सोडले. मात्र दुधना नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडेठाक पडल्यामुळे नदीकाठावरील गावांत पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे दुधना नदीपात्रात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. आ.विजय भांबळे यांनी परभणी व औरंगाबाद येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करुन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्याशी चर्चाही केली होती. त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी रविवारी संबंधित विभागाला दिले. सोमवारी सकाळी ९ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ४८ तास उघडे ठेवून ६00 क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर) -------------
|
दुधना प्रकल्पाचे पाणी आज नदीपात्रात
By admin | Updated: December 1, 2014 14:54 IST