परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात मंगळवारी पहाटे साडेचार तास बरसलेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण उडाली. या पावसामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले असून, शहरालगत गंगाखेड रस्त्यावर जागोजागी पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पूर्णा आणि जिंतूर तालुक्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाळ्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरदार बरसत आहे. अद्याप मान्सून दाखल झाला नाही. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मध्यम स्वरुपाचा असलेल्या या पावसाने काही वेळातच जोर पकडला. सकाळी ७.३० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. परभणी, जिंतूर आणि पूर्णा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळात १०० मि.मी., आडगाव ८२ मि.मी., दुधगाव ८१ मि.मी., पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात ११४.८ मि.मी., लिमला ६७, कात्नेश्वर ६८ आणि चुडावा मंडळात ६५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या सातही मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते.
परभणी तालुक्यातील परभणी मंडळात ६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्याला पूर आला. परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी पुलाची कामे सुरू असून, शहराच्या हद्दीत एका बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे परभणी तालुक्याच्या हद्दीतील हा रस्ता पाण्याखाली गेला होता. पुलाच्या कामामुळे पर्यायी स्वरुपात तयार केलेले रस्ते वाहून गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती.
येलदरीत ४ दलघमीची वाढ
जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे येलदरी प्रकल्पात ४ दलघमी म्हणजे अर्धा टक्का पाणीसाठा वाढला आहे. पहिल्याच पावसात धरणात नवीन पाणी दाखल झाल्याने यंदा धरण लवकरच भरण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता.
गोदामात शिरले पाणी
येलदरी येथील बाजारपेठ भागात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे सखल भागातून जाणारे पाणी या परिसरातील आडत व्यापारी सुनीलअप्पा एकशिंगे यांच्या गोदामात शिरले. गोदामातील हळद, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग या शेतमालाचे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतीचे नुकसान
पूर्णा तालुक्यातील गौर परिसरात गौर, नऱ्हापूर, गोविंदपूर, पिंपळगाव, आडगाव भागात जोरदार पाऊस झाला. या भागातील नदी-नाले तुडुंब भरुन वाहिले. काही शेतकऱ्यांचे बांध फुटून नुकसान झाले.
ओढ्यांना पूर
जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे परिसरातील ओढ्यांना पूर आला होता. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.