परभणी शहरातील अंतर्गत वसाहती तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची नेहमीच दुरवस्था झालेली असते. यात पावसाळ्याची भर पडली. मागील काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसाने खड्डे असलेल्या रस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. या पाण्यातून कसरत करत वाहन चालविण्याची वेळ अनेकांवर आली आहे. यामुळे खड्डेमय रस्त्यातून ये-जा करताना पाठदुखीचा त्रासही सहन करावा लागत आहे. परभणी महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची डागडुजी करण्यात आली; मात्र यामुळे परभणीकरांचा त्रास कमी झालेला नाही.
सुपरमार्केट रस्ता
शहरातील देशमुख गल्ली ते सुपर मार्केट हा वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गाने दिवसभरात हजारो वाहने ये-जा करतात. या रस्त्यावर मागील काही वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
प्रशासकीय इमारत रस्ता
स्टेडियम परिसरातून प्रशासकीय इमारतीमार्गे शिवाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून वाहनधारक ये-जा करताना त्रास सहन करीत आहेत.
बाजारपेठेतील तसेच अन्य रस्त्यांवर वाहन चालविताना सारखा गिअर बदलून वाहनाची गती कमी ठेवावी लागते. यामुळे दर महिन्याला वाहनाची दुरुस्ती करण्याची वेळ येत आहे.
- व्यंकटेश मालेवार, नागरिक.
ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना खड्ड्यातून ये-जा करण्यामुळे पाठीचे त्रास होत आहेत. अनेकांना यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे. मनपाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत.
- नितीन डावरे, नागरिक.
वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात. हे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वाधिक असते. यामुळे अशा रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनांची गती कमी ठेवून ये-जा करावी. शक्यतो ऑटोतून प्रवास करणे टाळावे.
- डॉ. उत्तम वानखेडे, तज्ज्ञ.
वार्षिक निधीतून तात्पुरती कामे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील अनेक रस्त्यांची वार्षिक निधीतून तात्पुरती डागडुजी करण्याचे काम मनपा करते. यावर लाखो रुपये खर्च होतात; मात्र खड्डे जशास तसे राहतात. शहरातील किमान २० ते २५ रस्त्याने ये-जा करणे खड्ड्यांमुळे कठीण होऊन बसले आहे.