परभणी हे दक्षिण मध्य रेल्वे विभागातील महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून दिल्ली, अमृतसर, उत्तर भारत, दक्षिण भारत तसेच राज्यातील मुंबई, पूणे, नागपूर येथे ये-जा करण्यास दररोज रेल्वे उपलब्ध आहे. यासह मनमाड ते सिकंदराबाद, परळी, विकाराबाद, हैदराबाद, मिरज, दौंडपर्यंत कोरोनापूर्वी पॅसेंजर रेल्वे दररोज धावत होत्या. मागील एक वर्षाहून अधिक काळ ह्या पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. यामुळे पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. परभणी येथून किमान १२ ते १५ पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. यामुळे सेलू, मानवत, परतूर, जालना, गंगाखेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, लातूर रोड येथे ये-जा करणे सोपे जात होते. तसेच अनेक छोट्या-मोठ्या खेड्यांना तर प्रवाशांना रेल्वेने जाणे पॅसेंजर बंद असल्याने अशक्य झाले आहे. एकीकडे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, माॅल, बस, शासकीय कार्यालये, एक्सप्रेस सुरू आहेत, मग पॅसेंजरच का बंद ठेवल्या जात आहेत, असा सवाल प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन एक्स्प्रेस
नांदेड-मुंबई (तपोवन)
नांदेड-पनवेल
नांदेड-पुणे साप्ताहिक
नांदेड- मुंबई (राज्यराणी)
नांदेड- बेंगलोर
आदिलाबाद-मुंबई (नंदिग्राम)
सिकंदराबाद- मुंबई (देवगिरी)
हैदराबाद-औरंगाबाद
नांदेड-अमृतसर (सचखंड)
नगरसोल-नरसापूर
हैदराबाद -जयपूर
ओखा-रामेश्वरम
धर्माबाद-मनमाड (मराठवाडा)
केवळ नाव बदलून लूट सुरू
सध्या सुरू असलेल्या सर्व एक्सप्रेस रेल्वेलाच केवळ विशेष रेल्वे असे नाव देत त्यांचे भाडे प्रवाशांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारले जात आहेत. त्याच रेल्वे ज्या कोरोनापूर्वी धावत होत्या, त्यांना विशेष रेल्वेचा दर्जा दिला आहे. कोरोनापूर्वी दररोज धावणाऱ्या सर्व रेल्वेची संख्या ५० होती. ती आज केवळ २० ते २४ झाली आहे. तरी प्रवासाला लागणारा वेळ कमी होण्याऐवजी वाढला आहे. आणि सुविधा तर कोणत्याच दिल्या जात नाहीत.
मग पॅसेंजर बंद का?
परभणी-नांदेड
नांदेड-हैदराबाद
पूर्णा-हैदराबाद
पूर्णा-परळी
परळी-अकोला
मनमाड-काचिगुडा
नांदेड-नगरसोल
नांदेड-मनमाड
निझामाबाद-पुणे
निझामाबाद-पंढरपूर
या डेमू सुरू होणार
नांदेड-हैदराबाद, पूर्णा-हैदराबाद, परभणी-नांदेड या लोकल डेमू पॅसेंजर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रवाशांची मागणी लक्षात घेत नांदेड विभागाने पॅसेंजर डेमू रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच अधिकृत पत्र निघाल्यावर या विभागात २-३ रेल्वे सुरू होतील. यासाठी स्थानकावरील युटीएस टिकीट तसेच अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी तपासणी केली आहे. - अरविंद इंगोले, स्टेशन प्रबंधक, परभणी
एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही
किरकोळ कामासाठी आरक्षण करून ठेवणे शक्य होत नाही. औरंगाबाद जाण्यासाठी महिनेवारी पास दिल्यास अनेक प्रवाशांची गैरसोय दूर होईल. पॅसेंजर रेल्वे सुरू केल्यास टिकिटाच्या पैशातही बचत होईल. - मकरंद विडोळकर, प्रवासी.
दररोज बसने शिक्षणासाठी ये-जा करणे परवडत नाही. रेल्वेला एकतर आरक्षण काढल्याशिवाय प्रवेश नाही. यामुळे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींची गैरसोय दूर होण्यासाठी पॅसेंजर रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. - अक्षय कुलकर्णी, प्रवासी.