परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर अचानक फर्निचरने पेट घेतल्याने एकच धावपळ झाली. शनिवारी रात्री साधारणतः साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर जुने फर्निचर ठेवलेले आहे. ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास या फर्निचरने अचानक पेट घेतला. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच एकच धावपळ उडाली. ही माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, मदन जाधव, इनायत अली, गणेश गायकवाड, डी.यू. राठोड आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत जुने लाकडी फर्निचर जळून खाक झाले आहे. अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक आणि फायर ऑडिट करण्यात आले होते.