सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी या प्रकल्पाला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. त्यापैकी ४८ किमी लांबीचा उजवा कालवा परभणी तालुक्यातून जातो. या तालुक्यातील कार्ला, कुंभारी एकरुखा, डिग्रस, वाडी, नांदापूर, झरी, सावंगी आदी भागात कालव्याची व वितरिकेची कामे करण्यात आली आहेत. काम सुरू होताच येथील लाभार्थ्यांनी कामाविषयी तक्रारी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. परंतु, या विभागाने तात्पुरती डागडुजी करून ही कामे उरकून घेतली आहेत. कालव्याचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. सद्यस्थितीत निम्न दुधना प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्याची व वितरिकेची अर्धवट कामे व निकृष्ट दर्जाची असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती होऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे लाभाऐवजी शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसानच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे दोनच वर्षात अनेक ठिकाणी उजव्या कालव्याच्या वितरिकांना ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी कालवा खचला आहे. फरशी उखडली असून, कालव्यात वाढलेल्या झाडीमुळे दुरवस्थेत आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे प्रकल्पातून सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत तर सोडाच परंतु, कालवाअंतर्गत लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारांकडून दुरवस्था झालेल्या कालव्याची दुसऱ्यांदा कामे करून घ्यावीत, अशी मागणी चार गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.
५०० कोटींचा खर्च पाण्यात का?
निम्न दुधना प्रकल्पाच्या ४८ किमीच्या उजव्या कालव्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य कालव्यासह वितरिकांनाही काही ठिकाणी तडे गेले आहेत. असे असताना या पाटबंधारे विभागाकडून संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घातले जात आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे, तर दुसरीकडे निकृष्ट दर्जाची कामे करण्यात येत असतानाही अभियंत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागातील अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.