शहरातील भीमनगर येथील सिध्दार्थ विष्णू काळे याने पौर्णिमा गायकवाड या त्यांच्याच भागात राहणाऱ्या महिलेला ३० हजार रुपये डिसेंबर २०२० मध्ये हातउसणे दिले होते. दवाखान्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी पौर्णिमा गायकवाड यांच्या घरी जाऊन ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पैसे परत मागितले. यावेळी या महिलेने त्यांना घराबाहेर थांबण्यास सांगितले. त्यामुळे ते घराबाहेर थांबले असता तेथे पोैर्णिमा गायकवाड यांच्यासोबत राहणारा त्यांचा मोठा भाऊ दीपक काळे हा तिथे आला व त्याने तू इथे काय करतोस, असे विचारले. यावर सिद्धार्थ यांनी हातउसणे पैसे परत घेण्यासाठी आल्याचे सांगितल्यानंतर कसले पैसे म्हणून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास पुन्हा त्यांना दीपक काळे व पौर्णिमा गायकवाड यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे सिद्धार्थ काळे हे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी उड्डाणपुलाखालून जात असताना हे दोघेही दुचाकीवर तेथे आले. यावेळी पौर्णिमा गायकवाड यांनी जवळील चाकूने सिध्दार्थ काळे यांच्या हातावर, दंडावर व गळ्यावर वार करून जखमी केले. तसेच मोठा भाऊ दीपक काळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते दोघेही पळून गेले. त्यानंतर सिद्धार्थ यांच्या आईने त्यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. याबाबत १० एप्रिल रोजी सिद्धार्थ काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी दीपक काळे व पौर्णिमा गायकवाड यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांच्या वादातून मोठ्या भावासमोरच महिलेने केले चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST