सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी एका प्रकरणात २ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यास मुंबईच्या एसीबी पथकाने २४ जुलै रोजी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि कर्मचारी गणेश चव्हाण यांच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, वेगवेगळ्या मार्गांनी चौकशी सुरू केली आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी हे मंगळवारी परभणीत आले होते. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी ११ वाजता त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी काय सूचना दिल्या याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, तब्बल दोन तास केवळ पाल प्रकरणावरच चर्चा झाल्याची माहिती मिळाली. बैठकीस पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाशकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे वाचक पोलीस उपअधीक्षक सांगळे व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
डीआयजींनी घेतला राजेंद्र पाल प्रकरणाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST