मास्कचा वापर करण्याचे आवाहन
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यू. बी. बिराजदार यांनी केले आहे.
मिनी लॉकडाऊनचा फज्जा
गंगाखेड : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिल रोजी मिनी लॉकडाऊन करण्याबाबत आदेश काढले होते. मात्र, या आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापारी व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने उघडली होती. मात्र, या मिनी लॉकडॉऊनमध्ये बेकरी, मिठाई, किराणा, औषधे दुकाने, रुग्णालय, कृषी सेवा केंद्र यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश होते.
उजव्या कालव्याची दुरवस्था
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दोन वर्षांमध्येच दुरवस्था झाली आहे. जिंतूर तालुक्यातील कुंभारी, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी आदी गाव परिसरातील या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
विनापरवाना दारू वाहतूक वाढली
परभणी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू विक्री करणार्यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा
सोनपेठ : अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाला रानडुकरांच्या उपक्रमांची माहिती दिली. मात्र, वन विभागाच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय अद्याप दूर झालेली नाही. विशेष म्हणजे हे रान डुक्कर कळप करून ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.