सेलू तालुक्यात गव्हाची जोमात वाढ
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढली आहे. त्यामुळे गव्हाचे पीकही चांगले वाढत आहे. थंडी ही गव्हासाठी पूरक असल्याने त्याचा या पिकाला फायदा होत आहे. पाणीपातळीही चांगली असल्याने गव्हाच्या उत्पादनात यावर्षी वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणीपाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोयीचे झाले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरिपात झालेले नुकसान या माध्यमातून भरून निघण्याची आशा आहे.
ज्वारीचा पेरा घटला
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात यावर्षी ज्वारीचा पेरा घटल्याने उन्हाळ्यात कडब्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, कमी पेरा असल्याने ज्वारी दरामध्येही वाढ होऊ शकते. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना ज्वारीची भाकरी खाणे महागाचे होऊ शकते.
धोकादायक प्रवास
पूर्णा : तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढल्यानंतर या पुलावरून प्रवास करणे वाहनधारकांना धोकादायक वाटत आहे. पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
मानवत : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठ्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
कामाला गती येईना
मानवत : परभणी ते मानवत रोड या रस्त्याच्या कामाला गती येत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पेडगाव ते मानवत रोडच्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवाय मध्येच पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
पुलाचे काम थांबले
गंगाखेड : गंगाखेड-परभणी रस्त्यावरील विविध ठिकाणच्या पुलांचे काम थांबले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहेत. अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही या कामाला गती येत नाही.