निवडणुकीकडे लक्ष
पालम : येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. निवडणूक आयोगाने वाॅर्डरचना काही महिन्यांपूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याची उत्सुकता लागली आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष आहे.
गस्तीची मागणी
परभणी : शहरातील वकील कॉलनी, संभाजी नगर, राहुल नगर, गौतम नगर आदी भागांमध्ये पोलिसांच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे. काही टवाळखोर तरुण रात्री या भागात गोंधळ करीत फिरत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
दुभाजकावरील वृक्ष लागवडीला खो
परभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा ज्योतिबा फुले चौक या दरम्यानच्या दुभाजकावर महानगरपालिकेच्या वतीने शोभेची झाडे लावण्यात येणार होती. परंतु, मनपातील अधिकारी बदलल्यानंतर ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
स्वच्छतेची मागणी
परभणी : शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी खेळाडूंमधून करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देण्याची मागणी होत आहे.
‘सिग्नल सुरू करा’
परभणी : शहरातील विविध भागांतील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरातील सिग्नल बंद असल्याने अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हे सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.