गंगाखेड : कोरोना प्रतिबंधासाठी खबरदारी म्हणून तालुक्यात १ एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, ३ मे रोजी शहरातील बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे गंगाखेड शहरात लॉकडाऊन आहे की जत्रा, असा प्रश्न शहरवासीयांना पडला होता.
गंगाखेड तालुक्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिरकाव केला. त्यामुळे पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच तालुका प्रशासनाने कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वेगवेगळी पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र, रुग्णांची संख्या कमी होताना दिसून आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गंगाखेड शहर व तालुक्यात १ एप्रिलपासून कडक संचारबंदी लागू केली. या काळात केवळ दवाखाने, औषधांची दुकाने, अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप, गॅस वितरण, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ लागली. परिणामी तालुका प्रशासनाने १ मेपासून नागरिकांना अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बाजारपेठ, किराणा दुकाने उघडण्यास परवानगी दिली. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आली नाही. मात्र, ३ मे रोजी म्हणजे बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातील चारही रस्त्यांवर जणू काय जत्राच भरली होती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी कोणताही फिजिकल डिस्टन्स पाळण्यात आला नाही. त्याचबरोबर बहुतांश नागरिकांनी मास्क वापरण्याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी गंगाखेड शहरात बाजारपेठेतील गर्दी पाहून अनेक नागरिकांच्या मनात लॉकडाऊन आहे की जत्रा, असा प्रश्न निर्माण झाला होता.