मशागतीचा एकरी खर्च पोहोचला पाच हजारांवर
यावर्षी ऑक्टोबर व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याचा उपयोग करून उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. त्यासाठी नियोजनही सुरू केले आहे.
मात्र मागील १५ दिवसांपासून सतत डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्याने ट्रॅक्टरद्वारे शेतात होणारी मशागतही महागली आहे. त्यामुळे बळीराजाही एकरी ५०० ते १००० रुपये पाळी, पेरणी, रोटावेटर, नांगरणी यासाठी मोजावे लागत आहेत.
त्यामुळे एकीकडे डिझेलचे भाव वाढत असताना दुसरीकडे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे डिझेल भाववाढीचा थेट फटका शेत मशागतीला बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर उन्हाळी भुईमूग पेरण्याचे नियोजन आहे. मात्र त्यासाठी मजूर मिळत नसल्याने ट्रॅक्टरद्वारे पाळी व कापसाची पऱ्हाटी काढण्याचे काम करायचे आहे. मात्र ट्रॅक्टरचालकांनी इंधनदरवाढीचे कारण देत दरवाढ केली आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
- रामा जुंबडे, शेतकरी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरर्सना कोणतेही काम नव्हते. आता शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. मात्र दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढत असल्याने नाइलाजास्तव रोटावेटर, पाळी, नांगरणी आदींच्या भावामध्ये वाढ करावी लागली आहे. याचा फटका दोघांनाही बसत आहे.
- अर्जुन आव्हाड, ट्रॅक्टरमालक