पालम : शेतातील पिकांची आणेवारी काढण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सॅटेलाईट लोकेशनवरून पीककापणी प्रयोगाची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. यासाठी पालम तालुक्यातील ३० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शेतातील पीक विमा व इतर शासकीय अनुदान मिळण्यासाठी पीककापणी प्रयोग करून काढलेली आणेवारी निर्णायक ठरते. यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. पारंपरिक आणेवारी काढण्याच्या पद्धतीत अनेकवेळा शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. या दृष्टिकोनातून आता राज्य शासनाने पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन लाेेकेशनवरून पीक कापणी प्रयोग करण्यासाठीची ठिकाणे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागातील सांख्यिकी कक्षाच्या मदतीने विशिष्ट गावातील विशिष्ट सर्व्हे नंबर निश्चित करून याबाबतची गोपनीय माहिती यापूर्वी अधिकाऱ्यांना कळविली जात होती. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जात होती. आता या पद्धतीत बदल करून सॅटेलाईटचे लोकेशन घेऊन त्याचा अक्षांश, रेखांश कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. हे लोकेशन तपासून प्रथम, द्वितीय व अंतिम अशा तीन टप्प्यांतील पीककापणी प्रयोग करून पिकांची आणेवारी काढली जाणार आहे. पालम तालुक्यात अशी ३० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, सध्या ज्वारीचा पीककापणी प्रयोग करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. ही ३० ठिकाणे तालुका कृषी अधिकारी देशमुख, पर्यवेक्षक नंदू पवार, कृषी सहायक प्रमोद आनंदराव, दत्ता दुधाटे, अरविंद लोखंडे, अभय हनवते आदींचे पथक शोधून स्थळ निश्चित करत आहे.
सॅटेलाईट लोकेशनवर होणार पीककापणी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST