चालू आर्थिक वर्षात नियोजन समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विकासाचा कृती आराखडा तयार केला आहे. २२५ कोटी रुपयांचा हा कृती आराखडा असून, त्यात सहकार, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा अशा सर्वंकष विकास कामांचा समावेश आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी प्राधान्याने कोविडसाठी वापरण्याचे शासन स्तरावरून आदेश आहेत. नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी ३० टक्के निधी कोविडसाठी द्यावयाचा आहे. मागील महिन्यात जिल्हा नियोजन समितीला १० टक्के निधी प्राप्त झाला. मात्र, कोविडच्या प्राधान्यक्रमामुळे हा निधी कोरोनासाठीच वापरावा लागला.
प्राप्त झालेल्या निधीतून १६.९५ कोटी रुपये कोविडसाठी देण्यात आले आहेत. त्यात जिल्हा शल्यचिकित्सकअंतर्गत कामांना ५ कोटी ४० लाख आणि जिल्हा आरोग्य अधिकारीअंतर्गत ११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून कोविड सेंटरसाठी ३ कोटी रुपये आणि इतर सुविधांसाठी उर्वरित निधी वितरीत करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण तरतुदीत ६७ कोटी रुपये कोरोनासाठी वितरित करावयाचे आहेत. मात्र, अद्याप तेवढा निधी नियोजन समितीला प्राप्त झालेला नाही.
शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने जिल्ह्यातील विकासकामे सध्या ठप्प आहेत. मागील महिनाभरापासून कोरोना संसर्ग कमी झाला आहे. तेव्हा प्राधान्याने उर्वरित निधी वितरित करावा, अशी मागणी होत आहे.
यंत्रणांना निधीची प्रतीक्षा
जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना विकासकामे राबविण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीने विविध विकास घटकांसाठी निधी प्रस्तावित केला असला तरी प्रत्यक्षात शासनस्तरावरून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे विकासकामे हाती घेण्यासाठी निधीची प्रतीक्षा लागली आहे.
मागील वर्षीचा संपूर्ण निधी खर्च
मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला संपूर्ण निधी शासनाने वितरीत केला. यंत्रणांना हा निधी वितरीत झाला असून, खर्चही करण्यात आला आहे. या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. अद्याप काही यंत्रणांनी हे प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यांच्याकडे नियोजन समितीकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या विभागाला किती निधी प्रस्तावित
कृषी पशुसंवर्धन दुग्ध ८.१६
जनसुविधा १६.८०
शिक्षण १४.३८
अंगणवाडी ४.००
कौशल्य विकास ५.६८
आरोग्य (नॉन कोविड) ५१.३५
नगरविकास : ३३.६४
ऊर्जा : ८.००
रस्ते बांधकाम ३८.५९
यात्रा, पर्यटन : १५
निधी कोटीत