परभणी : वैद्यकीय, दूध विक्री आणि कृषी व शेतीशी संबंधित आस्थापनांची दुकाने वगळता २९ व ३० मे असे दोन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी आदेश काढला आहे. त्यात २९ व ३० मे या कालावधीत कोरोनाविषयक वैद्यकीय सेवा व सहायभूत सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहेत. तसेच कृषी निविष्ठा रासायनिक खते, औषधी, बी-बियाणे, शेती अवजारे व शेतीशी निगडित आस्थापना, गोदामे, बाजार समित्या, अडत बाजार यांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत तर डेअरीधारकांना सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत दूधविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.