परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या नऊ रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे.
मागील तीन दिवसांच्या तुलनेत रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही घटली असून, मृत रुग्णांची संख्याही कमी झाल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २ मे रोजी दिवसभरात जिल्हा रुग्णालयात २, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६ अशा एकूण नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला रविवारी २ हजार ४६९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ७८९ अहवालांमध्ये ६०६ आणि रॅपिड टेस्टच्या ६८० अहवालांमध्ये २१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार २५६ झाली असून, २९ हजार १३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ९१७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ८ हजार ३२६ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २६५, अक्षदा मंगल कार्यालयात १५९, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये २०० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ७९४ रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत.