परभणी : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने मागील एका महिन्यात शहरासह जिल्ह्यातील ४१ हजार ९६६ घरांतील कंटेनरचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये २ हजार ४३२ दूषित डासांचे नमुने आढळून आले. या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. मागील चार महिन्यांत एकही रुग्ण आढळला नसल्याने मलेरियाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व महापालिकेच्या नागरी हिवताप योजना विभागाच्यावतीने मलेरियाच्या उच्चाटनासाठी उपाययोजना राबविल्या जातात. यामध्ये दर महिन्याला १० टक्के घरांची तपासणी, डास उत्पत्ती होणारी ठिकाणे, कंटेनर सर्व्हे, दूषित भांडे यांची तपासणी केली जाते. मागील एक महिन्यात ४१ हजार ९६६ कंटेनर सर्व्हे करण्यात आले. यामध्ये २ हजार ४३२ दूषित डास नमुने आढळले. या घरातील ६१ हजार ३०३ भांड्यांची तपासणी केली असता २ हजार ९०८ दूषित भांडी आढळून आली. मागील चार महिन्यांत या विभागाच्यावतीने घरोघरी सर्व्हे करून मलेरियाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करण्यात आले.
अशी आहे आकडेवारी
वर्ष रुग्ण
२०१९ २
२०२० १
एप्रिलपर्यंत ००
२२ हजार ९०५ रक्त नमुने तपासले
मार्च महिन्यात घरोघरी करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेसोबतच रक्त नमुने तपासणी करण्यात आली. यात २२ हजार ९०५ रक्त नमुने तपासले. यामध्ये एकही रक्त नमुना दूषित आढळला नाही.
वीस ठिकाणी सोडले गप्पी मासे
परभणी महापालिकेच्यावतीने प्रत्येक प्रभागात ठरावीक दिवशी अळी नाशकाची फवारणी केली जाते. यामध्ये डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे तपासून तेथे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. अशा २० ठिकाणी गप्पी मासे सोडल्याने उत्पत्ती रोखण्यास मदत होणार आहे.
या उपाययोजना कराव्यात
घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
एका आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवू नये.
भांडी घासून कोरडी करून मगच त्यात पाणी भरावे.
डास उत्पत्ती वाढविणाऱ्या साहित्याची विल्हेवाट लावावी.
मच्छरदाणीचा वापर झोपताना करावा.
पाण्याची डबकी, तळी या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत.