विद्यापीठ रस्ता वाहतुकीसाठी बंद
परभणी : शहरातील रेल्वे स्थानकाजवळून विद्यापीठात जाणारा रस्ता दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठामध्ये प्रवेश करावा लागत आहे. तेव्हा उड्डाण पुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : जिल्ह्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अडखळत वाहने चालवावी लागत आहेत. जागोजागी खड्डे असल्याने अपघतांचे प्रमाणही वाढले आहे. वसमत रोड, जिंतूर रोड, पाथरी रोड आणि गंगाखेड रोडवर खड्डे झाले आहेत. बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर
परभणी : ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, ग्रामस्थांना अनेक वेळा रात्र अंधारात काढावी लागते. विशेष म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तो वेळेत दुरुस्त होत नाही. परिणामी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण कंपनीने विद्युत रोहित्रांची दुरुस्ती, जुन्या वीज तारा बदलणे आदी कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
परभणी : वातावरणात सतत बदल होत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. त्यातच किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांवर अनेक भागांत कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळत आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कीड व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नवीन नळ जोडण्यांना अल्प प्रतिसाद
परभणी : शहरात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र, या योजनेवर नळ जोडण्या घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे योजना चालविताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. येलदरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे.