संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची असते. आपण कितीही पैसा खर्च केला तरी संस्कार विकत घेता येत नाहीत. संस्काराने संतती सदाचारी होते म्हणून मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे आयोजित नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी देवजन्माच्या कीर्तनात ते मार्गदर्शन करीत आहेत. महाराज सांगितले की, भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला, असे सांगून त्यांनी भक्तांची लक्षणे सांगितली. सोमवारपासूनच भाविकांची पोखर्णी येथे गर्दी होत होती. मंगळवारी दर्शनासाठी सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यात एक लाख भाविकांनी हजेरी लावली. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक पोखर्णी येथे दाखल झाले होते. नृसिंह मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. नृसिंह मंदिर भाविकांनी फुलून गेला होता. पंचक्रोशितील भाविकांसाठी हा उत्सव दिवाळी सणासारखा असून गावातील विवाहित मुली नृसिंह जन्मासाठी माहेरी दाखल झाल्या होत्या. न्यू लाईफ रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दंत महाविद्यालयाच्या वतीने दंतरोेग शिबीरही घेण्यात आले. दुपारी १ वाजता संगीत भागवत कथा झाली. भागवत कथेत गोवर्धन पूजा, कंसवध व श्रीकृष्ण विवाहसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी साध्वी विश्वेश्वरीदेवी यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या विविध लिला, गीत संगीताच्या सोबतीने सांगितल्या. या नृसिंह जन्मोत्सव प्रसंगी नृसिंह मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता.
‘संपत्तीपेक्षा संस्काराने संतती सदाचारी’
By admin | Updated: May 14, 2014 01:13 IST