उघड्या डीपीमुळे ग्रामीण भागात धोका
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील बहुतांश गावात विद्युत पुरवठा करणाऱ्या डी. पी. या मुख्य रस्त्यावर आहेत. या डी. पी. पूर्णपणे उघड्यावर असल्याने गावातील ग्रामस्थांना येता - जाता यापासून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वापराअभावी शौचालय केवळ सांगाडा
देवगावफाटा : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत गावोगावी लाभार्थीनी अनुदान घेऊन बांधकाम केलेली शौचालये ही आजमितीला वापराअभावी केवळ सांगाडा म्हणून उभी आहेत. काही ठिकाणी या शोैचालयाचा वापर सरपण व शेणाच्या गोवऱ्या साठवण्यासाठी केला जात आहे.
रिडज ते भोगाव रस्ता दुरुस्तीची मागणी
भोगाव देवी : रिडज ते भोगाव देवी हा तीन किलोमीटर अंतर असलेला रस्ता अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असून, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तसेच वाहनचालकांनी वेळोवेळी तक्रार केली; परंतु अजूनही तक्रारीची दखल घेतली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
एस. टी. मालवाहतुकीला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
देवगावफाटा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाच्या वतीने एस. टी. मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सेलू व वालूर येथील उद्योजक, व्यापाऱ्यांकडून या मालवाहतूक उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा एस. टी. महामंडळास चांगलाच फायदा होताना दिसत आहे.
कालबाह्य वाहनांचा वापर धोकादायक
देवगावफाटा : सेलू तालुक्यात कालबाह्य वाहनांचा वाढता वापर हा धोकादायक झाला आहे. विशेषत: खासगी अवैध प्रवासी वाहतूक व वाळू वाहतूक करण्यासाठी या वाहनांचा वापर जास्त आहे. त्यामुळे अशा वाहनांना प्रवास बंदी करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.