पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैंदाणे, पोलीस कर्मचारी प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे व ज्ञानेश्वर घांदेवाड हे शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास वसमत फाटा नाकाबंदी पाॅइन्टवर बंदोबस्तकामी कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी संदीप रामराव देसाई येथून एमएच २०८६७१ क्रमांकाच्या दुचाकीवरून येथे आला. यावेळी त्याने मास्क लावला नव्हता. त्यामुळे पोलीस कर्मचारी कच्छवे यांनी त्यास मास्क का लावला नाही, असे विचारले असता त्याने त्यांच्याशी वाद घातला. कच्छवे हे त्यास समजावून सांगत असताना त्यांना शिवीगाळ करीत झटपट केली, तसेच तुम्ही लोकांना नेहमीच विनाकारण त्रास देता. म्हणून बाजूचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला व गंभीर जखमी केले. याच वेळी पापा ऊर्फ रामराव देसाई तेथे आले. त्यांनी पण आम्हास तुम्ही त्रास देता. तुमची हीच लायकी आहे, म्हणून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तेवढ्यात चुडावा गावाकडून एपी १६-४५६७ क्रमांकाची कार आली. त्या कारचे चालक सचिन देसाई याने भरघाव वेगात कार आणून त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून ते बाजूला झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. यावेळी पोलीस निरीक्षक सैंदाणे यांनी चालकास कार अंगावर घालून जीवे मारतो का, असे विचारले असता कारमधून उतरून सचिन देसाई याने तुम्हाला खतम करून टाकतो, म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन सैंदाणे व कर्मचारी ज्ञानेश्वर घांदेवाड यांनी अन्य पोलिसांना बोलावून तिन्ही आरोपींना पकडले. याबाबत पोलीस कर्मचारी कच्छवे यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सैंदाणे यांच्या मार्गदर्शनासाठी फौजदार पी. ए. पंडित करीत आहेत.
जखमी कच्छवे यांच्यावर नांदेडमध्ये उपचार
पोलीस कर्मचारी प्रभाकर कच्छवे यांना दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी कच्छवे यांची प्रभारी उप-विभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड यांनी भेट देऊन विचारपूस केली.