सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी आ. बाबाजानी दुर्राणी व माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून सोनपेठ येथे १४ डिसेंबरपासून कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे.
कापूस हंगाम २०२०-२१ या हंगामासाठी सोनपेठ कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी एसएमएसद्वारे कळवल्यानंतरच कापूस विक्रीसाठी जिनिंगवर आणावा, कापूस विक्रीस आणताना कापूस उत्पादक शेतकऱ्याने स्वतः हजर राहावे किंवा त्या कुटुंबातील प्रतिनिधी पाठवण्यात येत असल्यास त्या प्रतिनिधीचे नाव रेशन कार्डमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच कापूस विक्रीसाठी आणताना रेशन कार्ड झेरॉक्स, चालू वर्षाची सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे सोबत आणावीत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात व कापूस खरेदी केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळून मस्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर, उपसभापती मीना दशरथ सूर्यवंशी व सचिव अशोक भोसले यांनी केले आहे.