कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वारंवार संचारबंदी जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यवसाय व शासकीय कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे महामारीमुळे सर्व काही ठप्प असताना दुसरीकडे मात्र लाचखोरी जोरात सुरू असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यात २०२० ते २०२१ या काळात एकूण १७ कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल विभाग ७, शिक्षण विभाग २, सहकार विभागात १, गृह विभागात ३, ऊर्जा विभागात २, तर नगरविकास विभागात १, खाजगी १, असे एकूण १७ जणांनी लाच घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कोरोनाच्या काळात शासकीय कामे रखडली असताना दुसरीकडे महत्त्वाची कामे होत आहेत. त्यासाठी शासकीय अधिकारी मलाई खाण्यात गुंग असल्याचे वर्षभरात केलेल्या कारवाईमधून दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारात महसूल विभाग लाचखोरीत सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत आहे.
साडेतीन वर्षांत जिल्ह्यात लाचखोरीचे अर्धशतक
परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून साडेतीन वर्षांमध्ये ४९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०१८ मध्ये १८ जण या जाळ्यात अडकले असून, २०१९ मध्ये १४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २०२० मध्ये १३ जण लाचलुचपत प्रतिबंधक प्रशासनाच्या जाळ्यात अडकले असून, २०२१ या वर्षातील चार महिन्यांत चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या महामारीत ही लाचखोरी जोरात सुरू असून, महसूल विभाग सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत आहे.