वाळूअभावी रखडली कामे
परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने खुल्या बाजारपेठेत वााळू उपलब्ध नाही. परिणामी चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानात घरकूल बांधकाम करणे शक्य नसल्याने लाभार्थींनी घरकुलांची कामे बंद ठेवली आहेत. प्रशासनाने लाभार्थींना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुख्य रस्त्यांवर धुळीचे लोट
परभणी : जिल्ह्यातील तीनही मुख्य रस्त्यांच्या निर्मितीची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असून, धूळ वाढली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. गंगाखेड, जिंतूर आणि वसमत रस्त्यावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा उन्हाळ्यापूर्वी या रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
रिडज ते भोगाव रस्त्याची दुरवस्था
परभणी : रिडज ते भोगाव देवी हा ३ किमी अंतर असलेला रस्ता अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.