जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण बोटावर मोजण्याएवढेच असले तरी केव्हाही कोरोना उफाळून येऊ शकतो, या शक्यतेने जिल्ह्यात सध्या तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका संभवतो, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यावरून जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची बैठक पार पडली असून, बालकांसाठीची औषधीदेखील आरोग्य विभागाने सज्ज ठेवली आहे.
मात्र, सध्या तिसऱ्या लाटेत सर्व वयोगटातील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ऑक्सिजन खाटा, आयसीयू खाटाही पूर्वीप्रमाणेच सज्ज आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली असून तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आरोग्य प्रशासनाची तयारी असल्याचे दिसते.
दीड हजार खाटा
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या काळात निर्माण केलेल्या दीड हजार खाटा अजूनही तयार आहेत. कोविड रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर रुग्णांच्या गरजेप्रमाणे वाढविले जाऊ शकतात. सध्या रुग्ण नसल्याने या खाटा रिकाम्या असल्या तरी प्रशासनाने त्या कोविडसाठीच राखीव ठेवल्या आहेत.
बालकांसाठी ५० खाटांचे आयसीयू
येथील जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी ५० खाटांचा आयसीयू कक्ष सज्ज ठेवला आहे. त्याचप्रमाणे या कक्षात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयातही प्रकल्प
पीएम केअर आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यावतीने जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथेही ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पांची संख्या वाढविण्यात आली आहे.
एकूण १० ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यापैकी शहरातील जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दोन प्रकल्प सध्या कार्यरत झाले आहेत.
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची एनओसी मिळाली आहे. तसेच इतर ठिकाणी हे प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन स्वतःच्या खर्चाने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी करीत असून तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. एकंदर जिल्ह्यात १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू आहे.