वळण रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी
चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरात असलेल्या वळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे, तसेच अपघातही वाढले आहेत. सा.बां.ने वळण रस्त्यावर डांबरमिश्रित गिट्टी टाकावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
बसस्थानकात झुडपाचे साम्राज्य
सोनपेठ : येथील बसस्थानकात पाठीमागील व समोरच्या भागात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामध्ये डुकरे वावरताना दिसत आहेत, तसेच त्यामध्ये घाण कचरा पडलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी येत आहे. बसस्थानकातील झुडपे साफ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मोकळ्या जागांचा अवैद्य कामासाठी वापर
सेलू : शहरातील मोकळ्या मैदानावर रात्री मद्यपींचा वावर वाढला असून, ही मैदाने नशेबाजांचे अड्डे बनत आहेत. विशेषतः खेळाच्या मैदानात दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास व स्नॅस्कची रिकामी पाकिटे सर्वत्र पडलेली दिसून येत आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.
अवैध देशी दारूची विक्री जोरात
परभणी : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अवैध देशी दारूची विक्री जोरात सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे भल्या पहाटे दररोज दुचाकीवरून अवैध देशी दारूची वाहतूक करुन संबंधितांकडे पोहोच केली जात आहे.
खड्ड्यांमुळे झाले वाहनचालक त्रस्त
ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते खांबेगाव हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता खड्डेमय बनल्याने वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे दिवसांतून एक तरी अपघात होत आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे. सा.बां. विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.