परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी किशन विठ्ठलराव शिर्लेकर यांना मुंबई येथील कामगार कल्याण मंडळाकडून दिला जाणारा ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार कामगार मंत्री दिलीप वळसे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. किशन शिर्लेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने शिर्लेकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिर्लेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव वनिता वेदसिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विकास आयुक्त पंकज कुमार, कल्याण आयुक्त रविराज दळवे आदी उपस्थित होते. किशन शिर्लेकर यांना यापूर्वी भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही ‘आदर्श युवा’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्य परिवहन मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात उपमहाव्यवस्थापक महादेव काळे यांच्या हस्ते शिर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.
किशन शिर्लेकर यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST